Thursday 19 January 2023

शास्त्रशुद्ध विचारपद्धती वाढीस लागेल -प्रविण राहिंज

 शास्त्रशुद्ध विचारपद्धती वाढीस लागेल


या धोरणाच्या मसुद्यात शिक्षण अधिकाधिक कौशल्यपूरक व्यवसायाभिमुख करण्याची योजना आखण्यात आली आहे. खरंतर आपल्याकडं गुणवत्तेचा, हुशारीचा निकष हा ज्ञान आणि कौशल्यसंपादन यांबाबत राहिलेला नसून केवळ परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवर मिळालेल्या रैंकिंगवरच तो मोजला जातो. असं होणं एकांगीपणाचं होय.


साहजिकच सुसंस्कार, परोपकार, सहनशीलता, सद्गुण ही मूल्यं आता रैंकिंगच्या स्पर्धेत हरवली आहेत. एकत्र कुटुंबपद्धतीचा -हास होत चालला आहे. घरात आई-वडिलांना पालकांसाठी पुरेसा वेळ नसतो, समाजातही पूरक उपक्रम घडत नाहीत. अशा वेळी आपसूकच ही जबाबदारी शिक्षणयंत्रणेवर येते. या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात मूल्यवर्धन, तसेच राज्यघटनेतल्या मूल्यांचीही अभ्यासक्रमाशी योग्य सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केवळ संख्यात्मक नव्हे तर स्वतःचं विशिष्ट नैतिक अधिष्ठान निर्माण करणारं शिक्षण असावं आणि याबाबतीत पालकांचं उद्बोधन होणं आवश्यक आहे.


प्रत्येकाकडे काही विशिष्ट सुप्त गुण असतात. क्षमता असतात. काहीतरी वेगळं करण्याची आवड असते. त्यासाठी विचार करण्याची क्षमता आणि आवश्यक बुद्धिमत्ता असते. गरज आहे ती अशा क्षमता, अशी बुद्धिमत्ता ओळखण्याची आणि त्यानुसार संधी देण्याची. आपल्या भारतात सर्वाधिक तरुण मनुष्यबळ आहे. उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर हा तरुणवर्ग दुसऱ्या देशात जातो आणि त्या देशाला त्याच्या ज्ञानाचा आपसूकच लाभ होतो, हेही कुठंतरी थांबण्याची आवश्यकता आहे. चीन, जपान यांसारख्या देशात शिक्षण हे कौशल्य आणि तंत्रज्ञाननिर्माणासाठीच दिलं जातं; त्यामुळे तिथं सर्वाधिक सर्जनशीलता दिसून येते. आपल्याकडं मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिप्लोमा, डिग्री अशा अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कौशल्य-तंत्रज्ञानाचा विचार केला जातो. नवीन मसुद्यात नवीन आकृतिबंध ५+३+३+४ नुसार पायाभूत शिक्षण, प्राथमिक शिक्षण, उच्च प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण असा आहे. यात अंगणवाड्यांचा सहभाग असणार आहे हे खूप स्वागतार्ह होय.


पायाभूत शिक्षण (बालशिक्षण, पहिली, दुसरी) अधिकाधिक आनंददायी होण्यास त्यामुळे मदत होईल. बालशिक्षणाच्या माध्यमातून कृतिशिक्षण अधिक ठळकपणे देता येईल. चिमुकल्यांच्या शिक्षणाची हीच सुरवात असते, ती आनंदानं झाल्यास सर्व सहजसाध्य होईल. मात्र, अगदी पहिली-दुसरीतच गणिती क्रिया, लेखनकौशल्य आलंच पाहिजे हा सुशिक्षित पालकांचा अट्टहास थांबवणं हेच मोठं आव्हान आहे.


या धोरणात कला, वाणिज्य, विज्ञान शाखा असा भेद नसल्यामुळे आपल्या आवडत्या क्षेत्रात मनाप्रमाणे ज्ञान घेण्यासाठी कोणताही अडसर राहणार नाही. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार ज्ञानसंपादन करत राहतील. विज्ञानातल्या नीरस, कठीण अशा रासायनिक अभिक्रियांबरोबरच भारतीय साहित्याच्या आणि संस्कृतीच्या अमूल्य ठेव्याचाही आनंद त्यांना घेता येईल. माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून केवळ बारावीनंतर विविध प्रवेशपरीक्षांत चांगले गुण म्हणजेच उत्तम करिअर असा दृढ असलेला समज जाऊन तो अधिकाधिक व्यापक आणि विस्तृत होईल. इयत्ता नववीपासूनच मुलांच्या कलागुणांची जोपासना अधिक समावेशक आणि व्यापकपणे करता येईल. मुलांनाही ठराविक वर्षांतच अधिक ताण-तणाव न येता ती अधिक सक्षम बनतील. केवळ 'माहितीच्या संचया'पेक्षा 'संबोधा'चं अधिक दृढीकरण झाल्यास शाळेत मिळालेल्या ज्ञानापेक्षा स्वतःच्या अशा एका सर्जनशील, सुसंगत, तर्कसंगतीला धरून असलेल्या, विज्ञानाच्या कसोटीवर उतरणाऱ्या शास्त्रशुद्ध विचारपद्धतीचा अवलंब विद्यार्थी करू शकतील. विद्यार्थ्याच्या आकलनपूर्वक, समजपूर्वक वाचनावर आणि त्याच्या समग्र विश्लेषणावर अधिकाधिक भर दिला गेल्यास विद्यार्थी ज्ञानसमृद्ध बनतील.


• प्रवीण राहिंज, काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. नगर)

सूक्ष्म अध्ययन क्षमता विकसित करताना -प्रविण राहिंज

 सूक्ष्म अध्ययन क्षमता विकसित करताना


प्रवीण राहिंज


जि. प. प्राथ. शाळा माळवदे वस्ती, केंद्र-पिंपळवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर भ्रमणध्वनी : ९४०३१९२०५१


विदयार्थ्यांना शिकविताना शिक्षक जितका प्रयोगशील, सजग आणि अभ्यासू असेल तितका तो विदयार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीने सक्षम बनवीत असतो. भविष्यात विदयार्थ्यांना सूक्ष्म अध्ययनाची सवय लागावी व त्यातून सूक्ष्म चिकित्सा करण्याची स्पर्धात्मक युगात शिक्षकांची क्षमता विकसित व्हावी या दृष्टीने अहमदनगरच्या पिंपळवाडी भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरत येथील शाळेत राबविलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाविषयी...


आजच्या माहिती तंत्र- ज्ञानाच्या युगात आणि दररोज नवनवीन अध्ययन-अध्यापन पद्धतींचा उगम होणाऱ्या या आली आहे. खरं तर शिक्षकाची भूमिका ही नवनवीन अध्ययन-अध्यापन पद्धती विकसित आणि अनुभवातून ती विकसित झाली तर यापेक्षा आणखी मोठे यश दुसरे कोणते असणार नाही. शिक्षकाची भूमिका ही मित्राची, मार्गदर्शकाची, सुलभकाची असणार आहे. आपल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यात स्वयंअध्ययनासाठी प्रेरक व पूरक परिस्थिती निर्माण करण्यात शिक्षकाचे खरे कौशल्य आहे. स्वयं- अध्ययनाच्या माध्यमातून एक चांगली अध्ययन सवय (Learning habit) विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते.


आपली अध्यापन पद्धती ही विद्यार्थिकेंद्रित असायला हवी. अध्यापन पद्धती जितकी विद्यार्थिकेंद्रित तितके विद्यार्थी अधिक ज्ञानवान होत जाणार. शिक्षक काय शिकवितो यापेक्षा विद्यार्थ्याला किती समजते आणि तो कसा शिकतो हे अधिक महत्त्वाचे आहे. विदयार्थी अध्ययन घटकाशी किती एकरूप होतो हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.


ऐकलेल्या, पाहिलेल्या, शिकविलेल्या ज्ञानापेक्षा विदयार्थ्यांनी स्वतः कृती करून व स्वानुभवातून, स्वतःच्या कुवतीप्रमाणे अर्जित केलेले ज्ञान अधिक आनंददायी व चिरकाल स्मरणात राहणारे असते. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत स्वावलंबन आणि स्वतःचे सहभागी होणे फार महत्त्वाचे असते. स्वत:हून ज्ञान मिळविण्याची प्रेरणा निर्माण करणे आणि आपण स्वतः ज्ञानार्जन करू शकतो हा आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण होणे हीच शिक्षकाची खरी कसोटी आहे, यामुळे विद्यार्थी आयुष्यभर 'विद्यार्थीच' राहून ज्ञानार्जन करतो.


मी माझ्या वर्गामध्ये वापरत असलेल्या भाषा विषयाच्या अध्यापनपूर्व कृतींविषयी आपणाशी चर्चा करणार आहे. आपल्या


जीवन शिक्षण / नोव्हेंबर २०१८


अध्ययन घटकाच्या सूक्ष्म विश्लेषणाची ही एक पद्धत आहे. या पद्धतीतून, कृतींतून विदयार्थ्यांना सूक्ष्म अध्ययनाची (Micro-learning) सवय लागते. सूक्ष्म चिकित्सा करण्याची ही


सवय विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणासाठीची पूर्वतयारी होऊ शकते. करणाऱ्या तत्त्वज्ञांपेक्षा शिक्षकांच्या स्वतःच्या विचारमंथनातून धडा शिकविण्यापूर्वी करावयाच्या कृती :


१) विदयार्थ्यासमवेत पाठाचे प्रकटवाचन (गट- सामूहिक वाचन ) : यातून पाठाचा आशय आणि काही प्रमाणात पाठाची मध्यवर्ती संकल्पना, पात्रांचा प्राथमिक परिचय होण्यास मदत होईल. तसेच आकलनासह वाचन हा हेतू साध्य होण्यास काही प्रमाणात मदत होईल


२) जोडशब्द वाचन व त्यांचे श्रुतलेखन: पाठातील जोडशब्द शोधण्याच्या उद्देशाने विदयार्थ्यांकडून पाठाचे पुन्हा वाचन होईल. वाचलेल्या जोडशब्दांच्या श्रुतलेखनाच्या सरावाने शब्दाशी संबंधित घटनांची उजळणी होईल आणि श्रुतलेखनाचा उद्देशही साध्य होईल.


३) पाठातील विरामचिन्हांचा परिचय स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, अवतरणचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह केव्हा वापरायचे हे समजते.


उदा. पाठातील प्रश्नचिन्ह असणारी वाक्ये शोधून लिहा. उद्गारवाचक चिन्ह असणारी वाक्ये शोधून लिहा. यातून पाठातील घटना व पात्रांचा संदर्भ लक्षात येतो.


उदा. ईदगाह पाठातील किती रम्य, किती सुंदर सकाळ आहे ही! आज सूर्य पहा किती सुरेख दिसतोय! किती शांत, किती सुखद !


उदा. विक्रीसाठी का नाही? इथवर बोजा आणला असता का?


४) कोण कोणास म्हणाले?: यामध्ये पाठातील संवादाच्या वाक्यांचा आणि एकेरी व दुहेरी अवतरण चिन्हांतील वाक्यांचा समावेश होतो. याद्वारे पाठातील मुख्य वाक्य,


नियोजनावर भर दया, तिथेष तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते.


२७

 मुख्य पात्र, उपपात्रांचा परिचय होतो. संवादाच्या वेळची परिस्थिती व घटनाक्रम समजण्यास मदत होते.


५) पाठातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद परिचय : पाठात आलेल्या शब्दांचे वर्गीकरण केल्याने व्याकरण हा घटक पुन्हा स्वतंत्रपणे शिकविण्याची गरज भासत नाही. विदयार्थी अगदी सहज आणि नकळतपणे व्याकरणासारखा रुक्ष भाग अगदी आनंदाने आत्मसात करतात. त्या निमित्ताने पुन्हा एकदा पाठाचे सूक्ष्म वाचन विदयार्थ्यांकडून केले जाते.


६) पाठातील वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, लिंग बदला, म्हणी, एकवचन अनेकवचनयुक्त शब्द शोधणे : पाठात आलेले वाक्प्रचार, म्हणी त्यांचा अर्थ हे मात्र शिक्षकांकडून सांगण्यात यावे आणि त्यांचे उपयोजन करण्यास विदयार्थ्यांना सांगावे. विद्यार्थी त्यांच्या कुवतीप्रमाणे पाठातील समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, लिंग, एकवचन, अनेकवचनयुक्त शब्द शोधण्याचा प्रयत्न करतील.


७) पाठातील पात्रांविषयी माहिती लेखन व सादरीकरण : विद्यार्थ्यांना पाठातील पात्रांविषयी स्वत:च्या शब्दांत त्यांच्या आकलनानुसार माहिती लिहिण्यास सांगावे. (पाठात अनेक पात्रे असल्यास आवडत्या पात्राविषयी लिहिण्यास सांगावे). लिहिलेल्या मजकुराचे सादरीकरण गटात किंवा वर्गातील विदयार्थ्यांसमोर करण्यास सांगावे. यातून आपणाला विद्यार्थ्यांची अभिव्यक्त होण्याची क्षमता कळेल, तसेच त्यांच्यात सभाधीटपणा येऊन त्याचे रूपांतर आत्मविश्वासात होईल. निर्भीडपणाने आपले विचार मांडण्याची सवय वाढीस लागेल.


८) पाठातील वाक्यांवर आधारित प्रश्न तयार करणे: यामध्ये पाठात आलेल्या वाक्यांवर आधारित छोटे-छोटे प्रश्न विद्यार्थी तयार करतील. उदा. 'रमजान'


महिन्याच्या तीस दिवसांनंतर ईदचा दिवस आला आहे. प्रश्न- ईदचा दिवस कधी आला आहे? ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. प्रश्न- तानसा धरण कोठे आहे?


२) ठाणे जिल्ह्यात कोणते धरण आहे? ३) शहापूर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे?


आपणा सर्वांना आश्चर्य वाटेल इतके छोटे-छोटे प्रश्न हे आपले बालमित्र बनवितात. एकेका धड्यावर विदयार्थी तब्बल १०० ते १५० सूक्ष्मातिसूक्ष्म प्रश्न काढतात. चिकित्सक


२८


स्त्री-पुरुषांमध्ये निवड नसावी, गुणे आदरावी सर्वकाळ ।


आणि जिज्ञासू पद्धतीने अधिकाधिक प्रश्न बनवितात. यातून विदयार्थ्यांच्या प्रश्ननिर्मिती कौशल्याला वाव मिळतो. त्या निमित्ताने ते पाठाचे अधिकाधिक सूक्ष्म वाचन करतात.


अशा पद्धतीने विविध कृतींच्या माध्यमातून आणि स्वयं- अध्ययन पद्धतीने आपल्या अध्यापन पद्धतीत बदल केल्यास विद्यार्थी स्वतःहून शिकतात आणि अधिकाधिक ज्ञानसंपन्न बनतात. आता शेवटी पाठातील एकच घटक शिक्षकांनी सांगण्याचा राहतो, तो म्हणजे पाठाशी संबंधित असणारे 'मूल्य' विदयार्थ्यांना समजावून सांगणे, कारण 'मूल्य' समजण्या इतपत त्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावलेल्या नसतात. एव्हाना या सर्व कृती करता करता संपूर्ण पाठ त्यांना समजलेला असतो. त्यांच्या नकळत विद्यार्थी सर्व काही शिकून बसलेले असतात आणि आता जेव्हा आपण म्हणतो "मुलांनो चला आपण आता हा पाठ / धडा शिकू या''. तेव्हा आपसूकच मुलांच्या तोंडून येते "सर आम्हांला सगळा धडा समजलाय, आम्हांला त्यातील सगळं येतंय." हे सांगताना मुलांच्या चेहन्यावरील आनंद पाहिल्यावर शिक्षकाच्या उभ्या आयुष्यातील समाधानाचा क्षण त्याहून दुसरा कोणताच असणार नाही हे वाटल्यावाचून राहत नाही. या पद्धतीने खऱ्या अर्थाने मुले स्वयं-अध्ययनातून शिकलेली असतात; ते कधीही न विसरण्यासाठी. त्यांनी स्वतः त्यांच्या ज्ञानाची निर्मिती केलेली असते. ज्ञानात वाढ केलेली असते. या सर्व क्रियांतून निर्माण झालेला आत्मविश्वास भविष्यात त्यांच्या पंखांना उभारी दिल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकेच खरे.


सुरुवातीला आपल्याला वाटते की एवढी मोठी कृतींची ! यादी कधी पूर्ण होणार? अभ्यासक्रम पूर्ण होईल का ? एकाच विषयाला एवढा वेळ दयायला कसे जमणार ? शक्य आहे का ? या सर्व प्रश्नांना माझे तेच उत्तर आहे की, हे शिकवायचं नाहीच. फक्त मुलांकडून या कृती करून घ्यायच्या आहेत. निश्चितच सुरुवातीला हे समजून घेण्यात एक-दोन दिवस जातील. जाऊ दया. मात्र विद्यार्थ्यांच्यात आम्ही स्वतःहून शिकू शकतो हा आत्मविश्वास जर यातून वाढीस लागणार असेल, तर यापेक्षा आणखी वेगळे आपले ध्येय असूच शकत नाही असे मला वाटते. सुरुवातीला या कृतींपैकी एक, दोन, तीन अशा टप्प्या-टप्प्याने वाढवीत गेल्यास मुलांनाही ते अधिक आनंददायी वाटेल आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना या कृती करण्याची आवड लावणे होय. एकदा का मुलांना या कृती करण्याची आवड लागली की मुले स्वत:हून या कृती करतील आणि स्वयं-अध्ययनाच्या पद्धतीतून स्वतःहून शिकतील.


जीवन शिक्षण / नोव्हेंबर २०१८

Tuesday 17 January 2023

गटविकास अधिकारी जेव्हा मुलांसोबत घेतात भोजनाचा आस्वाद

 


आज दिनांक १७/१/२०२३ रोजी मा.कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी आदरणीय मा.अमोल जाधव साहेबांनी जिल्हा परिषद शाळा,कौडणे शाळेस भेट दिली .इयत्ता १ ली विद्यार्थी यांचे २३ पर्यंतचे पाढे पाठांतर पाहून दोन विद्यार्थी यांना प्रत्येकी १०० रुपये बक्षीस दिले ..शाळेचे मुख्याध्यापक मा.किशोर माकुडे  यांचा वाढदिवस आहे समजताच त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत वाढदिवसाच्या समारंभास उपस्थित राहिले व मुलांच्या सोबत जिलेबी व मिसळ याचा आस्वाद घेतला .......या प्रसंगी कृषी विस्तार अधिकारी मुकुंदराव पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी मा.देवराम लगड साहेब,केंद्रप्रमुख मा.उदयभान खराडे साहेब,शिक्षक बँकेचे संचालक मा.बाळासाहेब तापकीर , तालुका संघाचे सरचिटणीस मा.आदीकराव बचाटे , कौडणे गावचे सरपंच मा.श्री प्रमोद सुद्रिक ,   शाळा व्यवस्थापन  अध्यक्ष श्री शहाजी सुद्रिक  मानवाधिकार चे जिल्हाध्यक्ष श्री अनिल गंगावणे ,ग्रामसेवक श्रीम शेलार मॅडम ,शिक्षिका श्रीम जगताप मॅडम सौ दिक्षीत मॅडम.इत्यादी मान्यवर उपस्थित होते......🪷🪷🪷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏*

Friday 13 January 2023

सुपे,जगतापवस्ती व गोयकरवाडीच्या मुलांची रेल्वे सफर

 

🚆🚆🌴🌲 *NEW ASHTI*                     *TO*

 *SOLAPURWADI........* 🌲🌴🚆 🚆       


             *नुकतीच जि . प . प्राथ. शाळा सुपे, गोयकरवाडी आणि जगताप वस्ती या शाळांची एक दिवसाची शै . सहल आयोजित करण्यात आली . यामध्ये प्रमुख आकर्षण होते ते🚆🚆🚆🚆 रेल्वे प्रवासाचे . आता पर्यंत विद्यार्थ्यांनी गाण्यात, टिव्हीत आगगाडीचा अनुभव घेतला होता परंतु या सहलीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आगगाडीत 35 किमी चा ( 45 मिनिट )प्रवास केला .🚆🚆🚆🚆 न्यू आष्टी ते  सोलापूरवाडी . या मार्गात त्यांनी कडा व धानोरा स्टेशन पाहिले . प्रवास करताना मुलांनी पळणारी झाडे, शेती, ओढे ... इ . अनुभवले .🌴🌴🌲🌲🎄 स्टेशनवर सुरुवातीला जवळ येणारी आगगाडी पाहून जीव मुठीत धरणारी मुले आगगाडीच्या डब्यात केव्हा नाचू, खेळू लागली कळलेच नाही .प्रत्यक्ष आगगाडी सुरु झाल्यावर मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता . आगगाडीचा आवाज,पळणारी झाडे, आगगाडीतील सुख सुविधा पाहून मुले थक्क झाली . आगगाडीच्या डब्यात मुलांनी नाचून, गाऊन खूप आनंद उपभोगला . त्यांच्या चेह-यावरील आनंद  कोणत्याही एककाने न मोजता येणारा होता . सोलापूरवाडीत आगगाडीतून मुलांना उतरावेशेच वाटत नव्हते . शेवटी त्यांनी जड अंतःकरणाने आगगाडीला बाय बाय केला .*

           🚆🚆 *एरवी एस . टी . ने प्रवास केल्यानंतर प्रवास संपल्यावर लगेच तिकीट टाकून देणारी मुले जीवनात पहिल्यांदाच आगगाडीचा प्रवास केल्याने ते तिकीट मात्र जिवापाड जपताना दिसली .*⬜⬜⬜

          🕌🕌  *श्री . शेख महंमद महाराज - वायरा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्याठिकाणी मुलांनी दुपारच्या जेवणाचा मनमुराद आनंद लुटला . प्रवासा दरम्यान एक गोष्ट लक्षात आली की चार भिंतीच्या बाहेर पडल्यावर मुलं व्यक्त होतात . कारण सकाळ पासूनच मुलं अगदी मन मोकळ्या गप्पा मारताना दिसले . आगगाडीत बसायचंय म्हणून मला झोपचं आली नाही, मी सगळ्यात अगोदर उठले, मी आईला स्वयंपाक करू लागले, ... इ . प्रकारे मुलं मनमोकळेपणाने व्यक्त होत होती . वर्गात प्रश्नांची उत्तरे न देणारी मुले प्रवासात मात्र गाणी, गोष्टी, कोडी ... इ . मध्ये मन मोकळ्या पणाने व्यक्त होत होती .*

           🛥️🛥️ *प्रवास सिना धरणाजवळ येऊन लागल्याने धरणाच्या गप्पा सुरु झाल्या . नदीचे नाव, गावाचे नाव, धरणाचे फायदे .. इ माहिती मुलांना देत असताना अचानक एका प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले . वर्गात मितभाषी असणाऱ्या मुलाने सर, धरण म्हणजे काय हो?🛳️🛳️🚢 हा लक्षवेधी प्रश्न विचारला . सर्वांच्या नजरा त्या मुलाकडे खेळल्या . कारण त्याची जिज्ञासूवृत्ती जागी झाली . खरोखरचं चार भिंतीच्या बाहेरचं शिक्षण मुलांना व्यक्त होण्यास किती लाभदायक ठरू शकतं हे यातून कळलं . एक प्रकारे या शै . सहलीची ही अध्ययन निष्पत्तीच म्हणावी लागेल . काही क्षणातच धरण समोर पाहून त्या जिसासू मुलाच्या प्रश्नाचे उत्तर त्याला आपोआपच मिळाले हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते . सर्व मुले त्याच्याकडे समाधानाने पाहत होती .*🚢🚢⛴️🛥️

              🛕🛕🛕🛕🛕🛕🛕 *निमगाव गांगर्डा -सिना धरणाचे अथांग पाणी पाहून मुले थक्क झाली . समुद्र (सागर ), नदी, धरण, बंधारा, कालवा या संकल्पना मुलांच्या याठिकाणी दृढ झाल्या . मुलांना आता वेध लागले होते ते बाबांचे . मांदळी या ठिकाणी मुलांनी श्री आत्मारामगिरी बाबा यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला . यादरम्यान मुलांना जीवनातील अतिशय मौल्यवान अशी गोष्ट शिकण्यास मिळाली . ती म्हणजे स्वच्छता . प्रसाद घेण्यापूर्वी मुलांनी भोजनासाठी जे पात्र घेतले त्याची स्वच्छता आणि आपण प्रसाद घेतल्यावर त्याही पेक्षा स्वच्छ करून कसे ठेवले पाहिजे हे मूल्य मुलांनी येथे आत्मसात केले .*🌡️🌡️🧹🧹🧹🚿🚿🚿🚰🚰

           *प्रवासाचा आनंद मुले ज्या पद्धतीने घेत होती त्यामुळे त्यांना प्रवास संपूच नये असे वाटत होते . घरच्या प्रवासाला लागताना मुलांची एकच भावना होती कधी एकदा घरी जाईल आणि केलेली मज्जा घरच्यांना सांगेन !!!*🕵️‍♀️👩‍🌾

         🚆🚆 *मुलांनी सहलीचे अनुभव घरी कथन केल्यावर पालकांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या . आजी - आजोबा तर म्हणाले आमची हयात गेली पण आगगाडीत बसायचे सोडा पण साधी प्रत्यक्ष डोळ्यांनीही कधी रेल्वे पाहिली नाही . हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यांत शाळेविषयी वेगळीच आपुलकी जाणवत होती याचे फार मनाला समाधान वाटले .*🛣️🛤️

           🙏🙏 *शै . सहलीच्या निमित्ताने जे वाटले, जे अनुभवले, जे मुलांकडून शिकायला मिळाले ते आपणासमोर व्यक्त करावेसे वाटले . धन्यवाद .*🙏🙏

         

            🖊️  *शब्दांकन*🖊️


🙏 *श्री . खराडे अशोक कारभारी*     *उपाध्यापक - जि . प . प्राथ.शाळा गोयकरवाडी केंद्र - बहिरोबावाडी ता . कर्जत जि. अहमदनगर*🙏



Tuesday 13 December 2022

मी चित्रकार ...... शाळा, कोंभळी

आरुष हर्षल गांगर्डे इयत्ता १ ली जिल्हा परिषद शाळा, कोंभळी येथील विद्यार्थ्यांने काढलेले सुंदर चित्र .............खूप सुंदर आरुष ...👌👌👍👍👍👍

Tuesday 22 November 2022

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक : आनंददायी शिक्षणाकडे वाटचाल

 एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक : आनंददायी शिक्षणाकडे वाटचाल

प्रवीण राहिंज

जि. प. प्राथ. शाळा माळवदेवस्ती, जि. अहमदनगर

भ्रमणध्वनी: ९४०३१९२०५१

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इयत्ता पहिलीचे पाठ्यपुस्तक जेव्हा आम्हा शिक्षकांच्या हाती पडले, तेव्हा आमच्यासह सर्व पालकांच्या मनामध्ये अनेक शंकांनी काहूर माजविले. नेमके हे पुस्तक कोणत्या विषयाचे आहे आणि कोणत्या माध्यमाचे आहे हे समजणे कठीण झाले होते. कोणताही नवीन विचार, नवीन संकल्पना अंगवळणी पडायला जरा वेळ लागतो. ज्या वेळी शिक्षकांमध्ये चर्चा झाल्या, प्रशिक्षण झाले, अभ्यास झाला, त्या वेळी खऱ्या अर्थाने या एकात्मिक व दिववभाषिक पुस्तकाची महती पटली आणि समजलीसुद्धा नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधून आपल्या शिक्षण पद्धतीत खऱ्या अर्थाने बदलाच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची मागणी पालकवर्गातून सातत्याने केली जायची. कोरोनानंतर विदयार्थ्यांच्या शारीरिक स्थितीचा विचार करून ग्रामीण भागात जास्त अंतरावरून येणाऱ्या विदयार्थ्यांच्या बाबतीत शाळेत आल्यावर कंटाळवाणे वाटणे, उत्साह कमी होणे, थकवा येणे यांसारख्या समस्या प्रकर्षाने जाणवू लागल्या. या सर्वांचा गांभीर्याने केलेल्या विचारांचा परिपाक म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकांची केलेले निर्मिती होय.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० च्या दृष्टीने हे पाठ्यपुस्तक म्हणजे एक पुढचे पाऊलच म्हणावे लागेल आणि अशा प्रकारचा एक पथदर्शी प्रयोग करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या पाठ्यपुस्तकाच्या रचनेमध्ये नवीन शिक्षण धोरणातील विविध घटकांचा मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा विषय अनेकदा चर्चिला जातो. घर आणि शाळा यांतील अंतराचा विचार करून विदयार्थ्याच्या दप्तरात कमीतकमी साहित्य ठेवणे हा एक उपाय असला, तरी अभ्यासाचे साहित्य, खाण्यापिण्याचे साहित्य टाळणे शक्य नसते. पाठीवरच्या या ओझ्याबरोबरच शालेय स्तरावर शिकविले जाणारे अनेक विषय आणि त्यांची काठीण्यपातळी याचे. मानसिक/ बौद्धिक ओझेही मुले वाहत असतात. यावर काही उपाययोजना करता येईल का, याचा विचार करून पाठ्यपुस्तक मंडळाने एकात्मिक व विभाषिक पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. ती कशी आहेत या संदर्भातील माहिती या लेखात दिली आहे.

" एकात्मिकपणे विचार केला आहे. 'भाषा', 'गणित', 'इंग्रजी', 'खेळू करू शिकू' या विषयांतील विविध अध्ययन घटकांमध्ये, आशयांमध्ये कोणतीही भिंत न ठेवता अगदी कुशलतेने एकत्र गुंफण्यात आले आहे. एखादी संकल्पना कशा पद्धतीने शिकावी, आत्मसात करावी (Learn how to Learn) याची सुयोग्य मांडणी करण्यात आली आहे. 'निपुण भारत' या शासनाच्या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या 'विद्याप्रवेश' कार्यक्रमातील कृतींशी सुसंगत अशा अध्ययन अनुभवांची सांगड घातली आहे. पुस्तकांतील मराठी शब्दांबरोबरच, सूचनांसाठी काही इंग्रजी प्रतिशब्द, वाक्ये देण्यात आली आहेत; जेणेकरून विदयार्थ्यांना उच्च शिक्षणात येणारे संबोध, संकल्पना अगोदरच परिचित व्हाव्यात, त्यांच्या अध्ययनाचे दृढीकरण व्हावे हा मुख्य उद्देश आहे. ज्याप्रमाणे पहिलीपासून इंग्रजीचा आपणाला आज फायदा होत आहे. त्याप्रमाणे सर्वसामान्य व ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील शिक्षणासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे.

पहिलीसाठीचे हे पाठ्यपुस्तक एकूण चार भागांमध्ये विभागलेले आहे. मी आणि माझे कुटुंब, पाणी, प्राणी, वाहतूक व आपले मदतनीस या चार संकल्पनांच्या एकत्रीकरणातून साकारले आहे. या चारही भागांमध्ये सर्व विषयांतर्गत येणाऱ्या अध्ययनअनुभवांची, घटकांची अगदी शास्त्रीय पद्धतीने मांडणी केली आहे; जेणेकरून आपल्या मुलांचे शिकणे स्वतंत्र न राहता, त्यांचे अध्ययन अनुभव, पूर्वानुभव वेगवेगळे न राहता एकसंध होतील. ज्याप्रमाणे बाजारात गेल्यानंतर भाषा विषयातील संवाद कौशल्य, गणित विषयातील मोजमाप, नाणी, नोटा, कला, भाज्यांचे विविध प्रकार, रंग विविधता, कार्यानुभव, मालाची उपलब्धता, उपयुक्तता, साहित्याची सुबक मांडणी, खेळू करू शिकू, अन्न, वस्त्र, निवारा, गरजा, पशुपक्ष्यांचे संवर्धन या विषयांशी संबंधित सर्व अध्ययन अनुभव एकत्रितपणे मिळतात. मुलेही माहितीचे भांडार असतात. त्यांच्याकडील पूर्वज्ञान विषयाशी बांधून न ठेवता, आवश्यक त्या ठिकाणी त्याचे ज्ञानात रूपांतर करणे महत्त्वाचे आहे. मुलांच्या अध्ययनातील संबोध, संकल्पना या त्यांच्या अनुभवविश्वाशी जोडण्यात आल्या आहेत. मुलांच्या शिकण्याच्या मानसशास्त्रानुसार तसे न केल्यास त्या निरर्थक होऊन जातात.या पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ अगदी आनंददायी, प्रयोगशील, कृतियुक्त, विज्ञान- तंत्रज्ञानाचा उपयोग व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगणारे, भूतदया जोपासणारे, सर्जनशील विचाराला चालना देणारे, कला-कार्यानुभवाची आवड निर्माण करणारे, मूल्यशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे, गाभाभूत घटकांचा अंगीकार करणारे आणि बालमानसशास्त्रीय दृष्टिकोनातून शिक्षणाची गोडी लावणारे असेच आहे. जसे, घराची कळा अंगण सांगते, त्याप्रमाणे या मुखपृष्ठावरून उत्तम निर्मितीची प्रचीती येते. ही सर्व चित्रे सर्वच विषयांच्या कृतींचे प्रतिनिधित्व करीत आहेत. तसेच या पुस्तकात एकविसाव्या शतकातील कौशल्ये, चित्ररूप प्रतीके, Six thinking hats, Thinkers keys या सर्वांचा अध्ययन अध्यापनात वापर करताना विदयार्थ्यांच्या पूर्वानुभवांचा सुयोग्य वापर होईल या दृष्टीने पाठातील अध्ययन घटकांचा, आशयसमृद्धीचा आणि अध्ययन निष्पत्तींचा विचार केला आहे. विदयार्थ्यांच्या तर्कशक्तीला वाव देण्यासाठी जय विचारशक्तीला चालना देण्यासाठी Thinking hats/ Thinkers keys चा योग्य ठिकाणी वापर करण्यात आला आहे. यामध्ये चित्र संबोध, चित्ररूपी सूचनांचे प्रयोजन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे विदयार्थ्यांना स्वतःहून एखाद्या घटकावर कोणती क्रिया करायची याचे ज्ञान होईल आणि पालकांनाही मुलांना अध्ययनात मदत करणे सहज शक्य होईल. यातून खऱ्या अर्थाने मुलांचा स्वयंअध्ययनाचा पाया अधिक भक्कम होण्यास मदत होईल.एकविसाव्या शतकातील कौशल्ये अध्ययन- घटकाबाबत चिकित्सक विचार करणे, एखाद्या घटनेमागील कारणमीमांसा जाणणे, त्यामागील कार्यकारणभाव शोधणे आणि विदयार्थ्यांना विचारप्रवृत्त करणे यांसाठी उपयोगी ठरणार आहेत. भविष्यातील उच्च शिक्षणात उपयुक्त ठरणारी सर्जनशीलता आणि स्वतःकडील ज्ञानाचे उपयोजन करण्याची क्षमता वाढविणाऱ्या गुणांची पायाभरणी इथेच होणार आहे. विद्यार्थी त्यांच्या पूर्वानुभवांच्या आधारे ज्ञानाची निर्मिती करणार आहेत. साक्षरता कौशल्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्रोतांद्वारे मिळणाऱ्या सत्यासत्यता तर्काच्या ज्ञानावर पारखून घेतली जाणार आहे.आजच्या स्पर्धेच्या धकाधकीच्या जीवनात विदयार्थ्यांच्या सामाजिकीकरणासाठी जीवनकौशल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित झालेले आहे. चित्रवाचन, चित्रगप्पा, कोडी, सर्जनात्मक कृती, निरीक्षण, चित्रकथा Action Time, Conversation इ. नियोजनबद्ध पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. एकंदरीतच इयत्ता पहिलीपासूनच ज्ञानरचनावादाच्या तत्त्वांचा आणि त्यातील सूक्ष्म अध्ययनकौशल्यांचा विकास होण्यासाठी या सर्व कृतींचा नक्कीच उपयोग होणार आहे.

• Six Thinking Hats: कोणतीही समस्या सोडविण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विचार करण्याऐवजी एका नावीन्यपूर्ण पद्धतीने सर्जनशील विचार करून समस्या सोडविणे म्हणजेच Lateral Thinking होय. संशोधक एडवर्ड डी बोनो यांच्या व्यवस्थापन क्षेत्रातील ही एक विचारपद्धती आहे. आपल्या शिक्षणक्षेत्रातील समस्या निराकरणासाठी ती समांतर पद्धतीने वापरायची आहे. विचार करणे हेसुद्धा एक कौशल्य आहे व ते केवळ सरावानेच शक्य आहे. यातूनच शास्त्रशुद्ध विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होणार आहे. यामध्ये सहा रंगांच्या Hats आहेत. रंगांवरून आणि आशयाच्या अनुषंगाने त्यांचा वापर करावयाचा आहे. विचारातील वैविध्य आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे, त्याचे फायदे कोणते आहेत, प्राप्त परिस्थितीनुसार योग्य निर्णय कोणता घ्यावा, कसा घ्यावा याविषयीचे ज्ञान होते. बालभारती

एक स्वतंत्र विचारसरणी विकसित करण्यासाठी हे खूप

उपयुक्त होणार आहे. यामधील रंगांचा अर्थ काय आहे

याविषयी पाहूया :

१) पांढरा रंग-पारदर्शकता : वस्तुनिष्ठ व निःपक्षपाती विचार करणे.

२) पिवळा रंग- सूर्याचे प्रतीक आशावादी, आनंदी, उत्साही, कार्यकारणभाव समजून घेणे. 

३) हिरवा रंग सर्जनशील विचार ज्ञानरचनावाद आधारित कृती, विचारशक्ती, कृतीला चालना देणे.

४) लाल रंग भावनिक विचार संवेदनशीलता, : मूल्यविकसन व भावनिकतेला प्राधान्य.

५) काळा रंग नकारात्मकता: संभाव्य भविष्यकालीन धोके, तोटे, चूक काय ते समजणे,

६) निळा रंग सर्वसमावेशकता : सर्वांगीण विचार,अंतिम निर्णय, सारासार विचार इ.

● Thinkers Keys : विदयार्थ्यांना अधिकाधिक

विचारप्रवर्तक बनविणे, त्यांच्या विचारांचा आदर करणे, स्वीकार करणे, त्यांना चिकित्सक विचार करण्याची संधी देणे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, विचार करण्याचे कौशल्य निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचा वैयक्तिक प्रतिसाद तपासणे आणि त्यांना अभिव्यक्त होण्यासाठी संधी देणे महत्त्वाचे आहे. याद्वारे विदयार्थ्यांच्या भावनेचा अचूक अंदाज लावता येईल. यामध्ये सात प्रकारच्या विचारप्रवर्तक चाव्यांचा वापर करण्यात आला आहे. त्या पुढीलप्रमाणे :

What is Key : तर काय ? अभ्यास नाही केला तर काय ? झाडांना पाणी नाही दिले तर काय ? शाळेत स्वच्छता / नियम नसतील तर काय ?

. Reverse Key ; उलट चावी,विचारप्रवर्तक करणारी चावी

 Picture Key : आशय आणि विचार यांचा सहसंबंध लावण्यासाठी, निरीक्षण, विचार करण्यासाठी, मांडणी करण्यासाठी.

. Question Key : विधानात्मक प्रश्न, बेरीज १० अशा दोन संख्या कोणत्या ?

. Brain Storming Key : जास्तीत जास्त अचूक पर्यायांचा विचार करणे, उदा. शाळा स्वच्छ ठेवण्यासाठी काय करावे? पाळीव प्राण्यांचे उपयोग कोणते आहेत?

• Construction Key : उपयोगी साहित्य कोणते, कागदकाम, मातीकाम, टाकाऊपासून वस्तू इ. टिकाऊ

• Disadvantage Key : तोटे, नुकसान कशापासून होईल? टीव्ही, मोबाइल जास्त पाहिल्यावर काय होईल ?

. Different Uses Key : उदा., झाडांचे उपयोग कोणते ? औषधी वनस्पती कोणत्या, अवयवांचे उपयोग काय आहेत. इ. अशा प्रकारे शिक्षकांनी आपल्या अध्यापन घटकांचे सूक्ष्म नियोजन करून वरीलप्रमाणे कुशलतेने वापर केल्यास आपल्या विदयार्थ्यांची उच्च शिक्षणाची पायाभरणी करण्याची संधी मिळणार आहे. शालेय पातळीवरील विविध समित्यांच्या माध्यमातून आपण पालकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजामध्ये, या एकात्मिक व द्द्विभाषिक पाठ्यपुस्तकांविषयी एक सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होईल, असे मला वाटते.

*जीवन शिक्षण/ ऑक्टोबर दिवाळी अंक 2022*.

Saturday 19 November 2022

मलठण शाळेत भरला आनंदी बाजार

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण येथे भरला आनंदी बाजार

           


जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावे. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती व्हावी. आपण जे पुस्तकात शिकतो ते व्यवहारात वापरता यावे. गणिती क्रिया तोंडी करता याव्यात. विक्रेता गिऱ्हाईक संकल्पना स्पष्ट व्हावी. वस्तू मोजण्यासाठी मापनाची माहिती मिळावी. यासाठी मलठण शाळेत आनंदी बाजाराचे आयोजन केले होते.  आपल्या स्वतःच्या खऱ्या कमाईचा आनंद आगळावेगळाच असतो. मुलांना भाजीपाला खाद्यपदार्थ विकून पैसे मिळाले.  मुलाखतीत एका पहिलीच्या मुलीने सांगितले की हे मिळालेले पैसे मी आता माझ्या गल्ल्यात टाकणार आहे. तिने भजे विकून शंभर रुपये मिळविले. तसेच बाजारात खाद्यपदार्थ घेताना एका मुलाचे शंभर रुपये हरवले होते. एका मुलीला ते सापडले तिने ते प्रामाणिकपणे माझ्याकडे आणून दिले. व्यवहारातील प्रामाणिकपणा तिने स्वतःच्या कृतीतून दाखवून दिला.  वेगवेगळ्या उपक्रमातून मुलांना शैक्षणिक अनुभव दिले तर नक्कीच मुले घडतात. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण येथे नवनवीन उपक्रम राबविले जातात.

आनंदी बाजारास भेट देण्यासाठी येथे क्लिक करा..

https://youtu.be/4EujV4BAzJs

वाकणवाडीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा च अनुभवला रेल्वे प्रवास

 


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा  https://youtu.be/CcnzfQUvRq0

 जि. प.प्रा.शाळा -वाकणवाडी (खांडवी ) ता.कर्जत जि. अहमदनगर

🚆  ट्रेनची सफर 🚆 सोलापूरवाडी  ते आष्टी 🚆

           दि.15/11/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकणवाडी च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला झुक झुक आगगाडी चा प्रवास.  

       वाडी वस्ती वरील मुलांनी फक्त चित्रात पाहिलेली  रेल्वे, आज त्या रेल्वेमध्ये प्रत्यक्ष प्रवास करण्याचा  योग आला. आज सकाळी बनपिंप्री येथील वैशिष्ट्यपूर्ण भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन प्रवासाची सुरुवात केली. सोलापुरवाडी ते आष्टी स्टेशन व आष्टी स्टेशन ते सोलापूरवाडी असा  रेल्वे प्रवास मुलांनी मोठ्या आनंदात केला.

रेल्वे प्रवासाची मज्जा अनुभवल्यानंतर नांदूर ता-आष्टी येथे विठ्ठलाचे व वाहिरा ता-आष्टी येथे संत शेख महंमद बाबा यांचे दर्शन घेतले. निमगाव गांगर्डा येथील सीना धरणाचे नयनरम्य दृश्य पाहून परतीचा प्रवास सुरू केला .

विद्यार्थी प्रतिक्रिया:- आमच्या वाकणवाडीत एस.टी. सुध्दा येत नाही. मी कधीच एस.टी.मध्ये सुद्धा बसले नव्हते पण सरांनी आम्हाला रेल्वेत बसवले. - सृष्टी पठारे 4 थी

रेल्वे पहिल्यांदा पाहिली व रेल्वेमध्ये बसून खूप आनंद झाला-शुभ्रा तापकीर 4 थी

रेल्वेचा आवाज ऐकून सुरवातीला भीतीच वाटली पण रेल्वेत बसल्यावर लय मज्जा आली. - शौर्य पठारे 2 री

Thursday 6 October 2022

शिवारफेरी मधून प्रत्यक्ष अध्ययन अनुभव :-

 धनगरवाडी (केंद्र थेरगाव) शाळेचे विद्यार्थी सीना धरण येथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेताना:- 


धरणाचा सांडवा व बांध पाहताना विद्यार्थी
निमगाव गांगर्डा शाळेत दोन्ही शाळेचे विद्यार्थी व सर्व शिक्षक  

धनगरवाडी शाळेची शिवारफेरी अहमदनगर जिल्ह्याची दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या सीना धरणावर बांधलेल्या सीना धरणावर आयोजित करून विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देण्यात आले. यानंतर निमगाव गांगर्डा शाळेमध्ये  विद्यार्थ्यांनी एकत्रित अल्पोपहार घेतला व अध्ययन अनुभवांची देवाणघेवाण केली.

रेहेकुरी शाळेचे विद्यार्थी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह थेट अभयारण्यात :-

रेहेकुरी शाळेच्या विद्यार्थ्यांना अभयारण्य व वन्यजीवांची माहिती प्रत्यक्ष फिरून दाखवताना वन विभागाचे कर्मचारी

वन्यजीव सप्ताह अंतर्गत आज दिनांक 06/10/2022 रोजी जि प प्राथ शाळा रेहेकुरी शाळेने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी MFD खराडे साहेब यांनी विद्यार्थांना नाष्ट्याची व्यवस्था केली तसेच २ेहेकुरी काळवीट अभयारण्याबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच या ठिकाणी कर्जतचे जेष्ठ पत्रकार गणेश जेवरे साहेब उपस्थित त्यांनी ही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले . त्यानंतर विद्यार्थानी प्रत्यक्ष निरीक्षण मनोऱ्यावरून काळवीट हा देखणा प्राणी पाहिला एकंदर आजचा दिवस मुलांसाठी प्रत्यक्ष अनुभूती देणारा ठरला. वनविभाग रेहेकुरी सर्व स्टाफचे खूप खूप धन्यवाद.