शास्त्रशुद्ध विचारपद्धती वाढीस लागेल
या धोरणाच्या मसुद्यात शिक्षण अधिकाधिक कौशल्यपूरक व्यवसायाभिमुख करण्याची योजना आखण्यात आली आहे. खरंतर आपल्याकडं गुणवत्तेचा, हुशारीचा निकष हा ज्ञान आणि कौशल्यसंपादन यांबाबत राहिलेला नसून केवळ परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवर मिळालेल्या रैंकिंगवरच तो मोजला जातो. असं होणं एकांगीपणाचं होय.
साहजिकच सुसंस्कार, परोपकार, सहनशीलता, सद्गुण ही मूल्यं आता रैंकिंगच्या स्पर्धेत हरवली आहेत. एकत्र कुटुंबपद्धतीचा -हास होत चालला आहे. घरात आई-वडिलांना पालकांसाठी पुरेसा वेळ नसतो, समाजातही पूरक उपक्रम घडत नाहीत. अशा वेळी आपसूकच ही जबाबदारी शिक्षणयंत्रणेवर येते. या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात मूल्यवर्धन, तसेच राज्यघटनेतल्या मूल्यांचीही अभ्यासक्रमाशी योग्य सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केवळ संख्यात्मक नव्हे तर स्वतःचं विशिष्ट नैतिक अधिष्ठान निर्माण करणारं शिक्षण असावं आणि याबाबतीत पालकांचं उद्बोधन होणं आवश्यक आहे.
प्रत्येकाकडे काही विशिष्ट सुप्त गुण असतात. क्षमता असतात. काहीतरी वेगळं करण्याची आवड असते. त्यासाठी विचार करण्याची क्षमता आणि आवश्यक बुद्धिमत्ता असते. गरज आहे ती अशा क्षमता, अशी बुद्धिमत्ता ओळखण्याची आणि त्यानुसार संधी देण्याची. आपल्या भारतात सर्वाधिक तरुण मनुष्यबळ आहे. उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर हा तरुणवर्ग दुसऱ्या देशात जातो आणि त्या देशाला त्याच्या ज्ञानाचा आपसूकच लाभ होतो, हेही कुठंतरी थांबण्याची आवश्यकता आहे. चीन, जपान यांसारख्या देशात शिक्षण हे कौशल्य आणि तंत्रज्ञाननिर्माणासाठीच दिलं जातं; त्यामुळे तिथं सर्वाधिक सर्जनशीलता दिसून येते. आपल्याकडं मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिप्लोमा, डिग्री अशा अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कौशल्य-तंत्रज्ञानाचा विचार केला जातो. नवीन मसुद्यात नवीन आकृतिबंध ५+३+३+४ नुसार पायाभूत शिक्षण, प्राथमिक शिक्षण, उच्च प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण असा आहे. यात अंगणवाड्यांचा सहभाग असणार आहे हे खूप स्वागतार्ह होय.
पायाभूत शिक्षण (बालशिक्षण, पहिली, दुसरी) अधिकाधिक आनंददायी होण्यास त्यामुळे मदत होईल. बालशिक्षणाच्या माध्यमातून कृतिशिक्षण अधिक ठळकपणे देता येईल. चिमुकल्यांच्या शिक्षणाची हीच सुरवात असते, ती आनंदानं झाल्यास सर्व सहजसाध्य होईल. मात्र, अगदी पहिली-दुसरीतच गणिती क्रिया, लेखनकौशल्य आलंच पाहिजे हा सुशिक्षित पालकांचा अट्टहास थांबवणं हेच मोठं आव्हान आहे.
या धोरणात कला, वाणिज्य, विज्ञान शाखा असा भेद नसल्यामुळे आपल्या आवडत्या क्षेत्रात मनाप्रमाणे ज्ञान घेण्यासाठी कोणताही अडसर राहणार नाही. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार ज्ञानसंपादन करत राहतील. विज्ञानातल्या नीरस, कठीण अशा रासायनिक अभिक्रियांबरोबरच भारतीय साहित्याच्या आणि संस्कृतीच्या अमूल्य ठेव्याचाही आनंद त्यांना घेता येईल. माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून केवळ बारावीनंतर विविध प्रवेशपरीक्षांत चांगले गुण म्हणजेच उत्तम करिअर असा दृढ असलेला समज जाऊन तो अधिकाधिक व्यापक आणि विस्तृत होईल. इयत्ता नववीपासूनच मुलांच्या कलागुणांची जोपासना अधिक समावेशक आणि व्यापकपणे करता येईल. मुलांनाही ठराविक वर्षांतच अधिक ताण-तणाव न येता ती अधिक सक्षम बनतील. केवळ 'माहितीच्या संचया'पेक्षा 'संबोधा'चं अधिक दृढीकरण झाल्यास शाळेत मिळालेल्या ज्ञानापेक्षा स्वतःच्या अशा एका सर्जनशील, सुसंगत, तर्कसंगतीला धरून असलेल्या, विज्ञानाच्या कसोटीवर उतरणाऱ्या शास्त्रशुद्ध विचारपद्धतीचा अवलंब विद्यार्थी करू शकतील. विद्यार्थ्याच्या आकलनपूर्वक, समजपूर्वक वाचनावर आणि त्याच्या समग्र विश्लेषणावर अधिकाधिक भर दिला गेल्यास विद्यार्थी ज्ञानसमृद्ध बनतील.
• प्रवीण राहिंज, काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. नगर)
No comments:
Post a Comment