Sunday, 11 September 2022

आपले कर्जत ब्लॉगचे उद्घाटन संपन्न

     शिक्षक दिनाच्या निमित्ताने ५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, कर्जत पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे यांनी तालुक्यातील सर्व शिक्षकांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी. 'आपले कर्जत ' या ब्लॉगचे अनावरण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे व  गट विकास अधिकारी अमोल जाधव  यांच्या हस्ते ब्लॉगला क्लिक करून करण्यात आले. 

 







  यावेळी प्रत्येक केंद्रातील दोन तंत्रस्नेही शिक्षक, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना  गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे यांनी  सांगितले की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिक्षकांना त्यांच्या विचारांचे आदानप्रदान, माहिती , उपक्रम, शैक्षणिक अनुषंगाने वाचलेली पुस्तके त्यावरील त्यांचे मत व शिक्षकांनी लिखित केलेले लेख याला प्रसिद्धी देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ या ब्लॉगच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.  शिक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्स ब्लॉगच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना पोहोच होतील. शिक्षण विभागाशी संबंधित काही महत्त्वाच्या वेबसाइट्स, मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या वेबसाइट्स, शैक्षणिक साहित्य, उपक्रम, सर्व शिक्षकांना एकमेकांना प्रेरणा देणारे त्यांचे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा ब्लॉग उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले. यानंतर या ब्लॉगचे डिजाईन व निर्मिती करणारे मिरजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली येथील पदवीधर शिक्षक डॉक्टर बाबासाहेब पवार , देमनवाडी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र राऊत , धनगरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पवार यांच्या प्रयत्नातून या ब्लॉगची निर्मिती करण्यात आली असे श्रीमती शिवगुंडे यांनी सांगितले. 
     ब्लॉगची संकल्पना मांडणारे बाबासाहेब पवार यांनी ब्लॉग निर्मितीचा उद्देश सांगितला. व ब्लॉगच्या अंतर्भूत असलेल्या गोष्टी उपस्थितांना सांगितल्या. प्रत्येक केंद्रातील शाळेतील शिक्षक या ब्लॉगच्या माध्यमातून स्वतः व्यक्त होतील मुलांना त्याचा लाभ होईल अशा पद्धतीने या ब्लॉग चा उपयोग करण्याचे मार्गदर्शन केले.  तसेच गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सर्व शिक्षकांनी प्रशासकीय बाबीत न अडकता , कामकाजात मोकळेपणानं राहून या ब्लॉगवर स्वतःची मतं मांडावीत , इथे लिहावेत अशा पद्धतीची संकल्पना व्यक्त केली. या माध्यमातून अनेक खेड्यापाड्यातील मुलांपर्यंत या ब्लॉग च्या माध्यमातून सर्व शिक्षक एकत्रीत यावेत या दृष्टिकोनातून येथे व्यक्त व्हा. मोकळेपणाने मत मांडा आपले उपक्रम सांगा आपण वाचलेली पुस्तकं या ठिकाणी शेअर करा. जेणेकरून वाचन चळवळ रुजेल व तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या कल्पना या माध्यमातून निर्माण होईल असेही ते म्हणाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश जेवरे यांनी तालुक्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन शिक्षण क्षेत्र व पत्रकारिता क्षेत्र यांच्याविषयी खुमासदार शैलीतून आपले विचार मांडून शिक्षकांना तंत्रज्ञानाचा काळानुसार होणारे बदल आत्मसात करण्याविषयी महत्त्व सांगितले. शिक्षकांना त्यांच्या कार्याविषयी येणाऱ्या अडचणी त्यासाठी होणारी मदत तसेच पत्रकारितेतील काही बाबींचा आढावा यावेळी घेतला. 

        यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख उदयभान खराडे यांनी केले. आणि विस्ताराधिकारी देवराम लगड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पंचायत समितीच्या शिक्षण विस्ताराधिकारी उज्ज्वला गायकवाड, गट साधन केंद्राचे समन्वयक गोपाळघरे व त्यांचा स्टाफ ,केंद्रप्रमुख, तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र राऊत यांच्यासह मोठया संख्येने तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment