मातृभाषेत शिक्षण : व्यक्तिमत्व विकासाचे साधन
मानव इतर प्राण्यांपेक्षा बलशाली ठरण्याचे एकमेव कारण म्हणजे
त्याने त्याच्या बुद्धिमत्तेच्या जीवावर केलेला भाषा विकास होय. त्याला आलेले
अनुभव,
ज्ञान,
माहिती ही त्याने पहिल्या पिढीकडून दुसर्याकडे अशी हस्तांतरित करत करत अबाधित
ठेवली. मुखोद्गत केलेली सर्वच माहिती जशीच्या तशी पुढच्या पिढीकडे मौखिक स्वरुपात देणे
माणसास दुरापास्त झाले. पण माणसाकडे असणारे वेगळेपण म्हणजे त्याने अवगत केलेली
भाषा, त्याने ती लिपीबद्ध केली व आलेल्या अनुभवांना लिहून ठेवण्यास सुरुवात केली. अनेक
पिढ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून संचयित झालेला ज्ञानाचा महासागर भाषा व
त्यांची लिपी यामधून संग्रहित करण्यात आला. हा संग्रह आता दिवसेंदिवस इतका वाढत
गेला की, प्रत्येक व्यक्तीला हे सर्व ज्ञान अवगत करणे अवघड होत चालले
आहे. मग किमान पक्षी गरज, आवड व आवश्यक तेवढे ज्ञान घेण्याचा कल वाढत गेला आणि हे
ज्ञान घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली. यालाच आपण शिक्षण यंत्रणा
म्हणतो. या यंत्रणेचे काही टप्पे तयार करण्यात आले. प्राथमिक शिक्षण व तांत्रिक
कौशल्ये मिळणारे उच्च शिक्षण. किमान पातळीवर प्रत्येक मानवाने अथवा नागरिकाने अवगत
अकरावे असे शिक्षण प्राथमिक शिक्षण या स्वरुपात देण्यास सुरुवात झाली. हे शिक्षण
देखील वेगवेगळ्या पद्धतीने देण्यात येऊ लागले. भारत देशाचा विचार करता इंग्रजी
राजवटीच्या पूर्वी गुरुग्रही राहून शिक्षण घेण्याच्या पद्धतीला गुरुकुल पद्धती असे
म्हणत,
या शिक्षण पद्धती मध्ये शिकणं हे जगण्याशी निगडीत असे. शिकणं हेच जगणं असल्याने
शिक्षणाचा पुरेपूर वापर जीवन जगताना होत असे. इंग्रज राजवटीमध्ये शाळांची सुरुवात
झाली व औपचारिक शिक्षण व अनौपचारिक शिक्षण असे टप्पे निर्माण झाले.
आजच्या शिक्षण पद्धतीत आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना
आवश्यक असणारी अनेक कौशल्ये शाळेबाहेर शिकली जातात. शाळेत शिकवल्या जाणाऱ्या सर्वच
बाबींचा उपयोग दैनंदिन जीवन जगताना होईलच याची खात्री नसल्याने जगणे आणि शिकणे यात
फरक पडत गेला आणि शिक्षणाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत गेला. शाळेत शिकवल्या
जाणाऱ्या विषयांची रचना व विषय रचनेत शिक्षण घेताना मिळणारे स्वातंत्र्य हे कळीचे
मुद्दे ठरले व अनेक लोक शिक्षणापासून वंचित राहू लागले. इंग्रजी, गणित यासारखे तांत्रिक
असणारे विषय अनेकांना दैनंदिन जीवनात त्यांचा फारसा उपयोग होत नसताना त्याच्या
सक्तीमुळे अनेकांनी शाळेचा मार्ग सोडून जीवन जगण्यास सुरुवात केली. हल्ली
शिक्षणाकडे जरा सकारात्मकतेने पाहण्यास सुरुवात झाली असली तरी खरी मेख आहे
शिक्षणाच्या माध्यमाची.
शालेय शिक्षणात (औपचारिक शिक्षणात) प्रामुख्याने दोन बाबी
शिकवल्या जातात. एक भाषा आणि दुसरे माहिती असणारे विषय ज्याला आपण शास्त्र असे
म्हणतो. भाषा व भाषेतर असे विषयांचे दोन प्रमुख प्रकार पडतात. शिकणं ही प्रत्येक
मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे. त्यामुळे प्रत्येक मूल जन्माला आल्याबरोबर आईकडून
तिची भाषा शिकतं आणि त्याच्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात होते. भाषा अवगत
झाल्यावर त्याच्या जिज्ञासेतून पुढील शिक्षणाला सुरुवात होते. पण त्याचे नैसर्गिक माध्यम
हे त्याची मातृभाषा हेच असते.
जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले प्राथमिक ज्ञान, सवयी, जीवन मुल्ये, सामाजिक रिती रिवाज या
सर्व बाबी बाल वयात शिकल्या जातात. या गोष्टी ज्याने चांगल्या रीतीने अवगत केल्या
त्याचे शिक्षण चांगले झाले किंवा त्याचा चांगला विकास झाला असे म्हटले जाते. ज्या
व्यक्तीने आपण राहत असलेल्या समाजातील बारकावे अभ्यासले, त्यांच्या गरजांचा
अभ्यास केला, रिती रिवाज समजून आपल्या स्वत:च्या जगण्यातील प्राथमिकता
ठरवली व त्या समाजाप्रती असलेली आपली उपयुक्तता अधिक समृद्ध केली तर अशी व्यक्ती
त्या समाजासाठी उपयुक्त सिद्ध होते व अशा व्यक्तीचे व्यक्तिमत्व देखील खुलून
दिसते. हे सर्व घडण्यासाठी ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाची भाषा उत्तम रित्या
अवगत असणे आवश्यक आहे.
ज्ञानाला अथवा कौशल्याला विशिष्ट भाषा नसते. ज्ञान हे केवळ
ज्ञान असते मग ते कोणत्याही भाषेत असो. कौशल्ये देखील भाषा रहित असतात. उदाहरण
म्हणून आपण बेरजेचा विचार करू. दोन संख्या एकत्र केल्यानंतर तिसरी संख्या येते. ती
एकत्रित करण्याची रित समजल्यानंतर तिला बेरीज म्हणा किंवा अॅडीशन म्हणले तरी कृतीत
बदल होत नाही व उत्तर देखील बदलत नाही. जर ही कौशल्ये आपल्याला अवगत करायची असतील
तर ती मातृभाषेतून जितक्या सहजतेने शिकता येतात तितक्या सहजतेने परक्या भाषेतून
शिकता येत नाहीत. मातृभाषा प्राप्त झाल्यानंतर शिक्षणाची पुरती समज येईपर्यंतचा
प्रवास हा मातृभाषेतूनच व्हायला हवा हे अनेक शिक्षणतज्ज्ञांनी देखील सांगितले आहे.
आता शिक्षण क्षेत्राचा सामावेश व्यापारामध्ये झाल्याने
समाजाचे अतोनात नुकसान होताना दिसत आहेत. शिक्षण व्यवस्थेसमोरील सर्वात मोठे
आव्हान म्हणजे व्यापाराच्या गचाळ चिखलात बरबटलेले शिक्षण सात्विक पातळीवर आणणे हेच
आहे. व्यापारीकरण झालेल्या शिक्षणात जाहिरातीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले व
या जाहिरातींना बळी पडून शिक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचा अनोखा संबंध शोधला जाऊ
लागला. इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा बनल्यामुळे इंग्रजीचे आकर्षण सर्वत्रच वाढत
गेले आणि त्याची पातळी लक्षात न आल्याने प्राथमिक शिक्षण इंग्रजीच्या विळख्यात
गुंतत गेले. खाजगी शाळांनी फक्त नफेखोरीचा विचार केल्याने, त्यातच पालकांनी खोटी
प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मुले ही आपली अधुरी स्वप्ने पूर्ण करणारी यंत्रे समजून शिक्षणाच्या
प्रक्रियेचा (अध्ययन शास्त्राचा) अभ्यास न करता प्राथमिक शिक्षणच त्रयस्त भाषेत
देण्यास सुरुवात केली आणि सहज जगण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षण ताण तणावपूर्ण होऊ
लागले. यातून व्यक्तिमत्व विकास सोडाच मुलभूत क्षमता देखील दुरापास्त होऊ लागल्या.
काही कुशाग्र बुद्धीच्या मुलांनी मातृभाषेतून सहजशक्य असणारे प्राथमिक शिक्षण
त्रयस्त भाषेतून घेण्याची तारेवरची कसरत कशीतरी पूर्ण केली आणि अशा मुलांना सर्वांसाठी
आदर्श मानून सर्वच मध्यमवर्गीय कुटुंबातील सामान्य मुलांना याच काटेरी कुंपणावरून
चालण्याची अघोरी प्रथा रूढ होऊ लागली.
मुळात प्राथमिक शिक्षणामधून मुलभूत कौशल्ये विकसित होणे
अपेक्षित आहे, जी बालकाच्या व्यक्तिमत्व विकासाची मानके आहेत तीच मातृभाषेतून
जितक्या सहजतेने विकसित होतील तितकी परक्या भाषेतून विकसित होताना अधिक कष्ट
घ्यावे लागतील. एकदा बालकाचे व्यक्तिमत्व विकसित होऊन त्यामध्ये समज निर्माण झाली
की मग तो कितीही भाषा अवगत करू शकतो. अवगत झालेले ज्ञान पुन्हा इतर कितीही भाषेत
मांडणे शक्य आहे. पण प्राथमिक शिक्षण अवगत नसलेल्या त्रयस्त भाषेतून घेणे म्हणजे
सोपी वात महाअवघड करून ठेवण्यासारखे आहे. किमान प्राथमिक स्तरावरील शिक्षण हे
मातृभाषेतून मिळावे आणि प्रत्येक बालकामधील निसर्गदत्त व्यक्तिमत्व मातृभाषेच्या
प्रेमळ व सबल आधाराने फुला फळास यावे ही रास्त अपेक्षा आहे.
डॉ.
बाबासाहेब बलभीम पवार
जिल्हा
परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली.
निबंधातील विचार हे
लेखकाचे स्वत:चे आहेत व ते स्वत: यासाठी जबाबदार आहेत. फोन ७५८८०३१३००
खूपच छान सर आपले विचार अतिशय वास्तवाशी धरून मार्मिक आहेत समजूतदार शिक्षण फक्त मातृभाषेतुनच होते.
ReplyDelete