नोकरदार घडविण्यापलीकडचे शिक्षण
शिक्षण म्हणजे वही, पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे, नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आपण ज्या काळात राहतो, त्या काळाला जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण असे म्हणतात, तंत्रज्ञानाचा स्फोट म्हणतात आणि या स्फोटामधून माणसे माणसा पासून दूर उडत चालली आहेत. या दूर जाणाऱ्या माणसांना आपण जवळ आणायचे आहे, त्यासाठी आपणाला शिक्षणाची गरज आहे. शिक्षण म्हणण्यापेक्षा मूल्य शिक्षणाची गरज आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते.
आपल्या कडचे शिक्षण हे खालून वर ढकलणारे आहे. मुलगा दुसरीतून तिसरी मध्ये गेला म्हणजे तो शहाणा झाला. पण जगात असा कोणताही समाज क्लेम करत नाही की, मुलगा दुसरीतून तिसरीत गेला की त्याला ज्ञान प्राप्ती होते. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे म्हणून प्राथमिक शिक्षणाकडे शासनाचे विशेष लक्ष असले पाहिजे. शिक्षण हे अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावे.
माझा हा प्रत्येकाला एक प्रश्न आहे, आपण मुळात शिक्षण हे कशासाठी घेतो? कोणी म्हणेल जीवनात यशस्वी होण्यासाठी.. कोणी म्हणेल चांगल्या पैशांची नोकरी मिळवण्यासाठी.. कोणी म्हणेल डॉक्टर, इंजिनियर होण्यासाठी.. पण माझ्या मते इथे आपला हाच विचार चुकतो.महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवले, कशासाठी? पैशासाठी, संपत्तीसाठी की पदवी मिळवण्यासाठी तर नाही आपल्या शिक्षणाचा फायदा दुसऱ्या स्त्रियांना झाला पाहिजे, त्याही शिकल्या पाहिजेत. आपल्याला आपल्या शिक्षणातून दुसऱ्या लोकांचे भले करता आले पाहिजे. आपण समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या सेवेसाठी, आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, आपण समाजाचे ऋणी आहोत, यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण हे वर्तनात बदल करण्यासाठी असते, नुसते मार्क्स मिळवून काही मिळत नाही. शिक्षणाचा उपयोग वर्तनात बदल घडवण्यासाठी करा. चांगले वाईट यातील फरक समाजाला लागतो. आत्मसन्मान हा फक्त शिक्षणानेच जागृत होऊ शकतो, म्हणून शिक्षण घेतलेच पाहिजे. शाळेत मुलांना फक्त बाराखडी शिकवू नये,तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. ही आजची काळाची गरज आहे. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या सोयीसाठी नोकरदार घडविण्यासाठी जी शिक्षण पद्धती सुरू केली, तीच शिक्षण पद्धती आपण आजही वापरत आहोत.फक्त नोकरदार वर्ग घडविण्यासाठी.
C.W यांच्या मतानुसार " *Education without values as useful as it is seems rather to make man a more clever devil."* म्हणजेच मूल्याशिवाय शिक्षण हे माणसाला हुशार सैतान बनविण्यासारखे आहे.
नैतिक मूल्यांचे शिक्षण आपण योग्यवेळी दिले नाही तर संपूर्ण मानव जातीचेच भवितव्य धोक्यात येईल अशी भिती निर्माण झाली आहे.यावरील उपाय म्हणजे मानवाचे चारित्र्य संवर्धन.चारित्र्यसंवर्धन हा धर्म आणि नितीचा गाभा मानला जातो. त्या दृष्टीने चारित्र्यसंवर्धनाची उभारणी आपण मूल्यशिक्षणातूनच दिली पाहिजे.
उच्च शिक्षण घेऊन, विविध स्पर्धा परीक्षा देऊन अनेकजण उच्च पदावरती अधिकारी बनतात; पण त्या पदावर गेल्यावर ते भ्रष्टाचारा सारख्या वाम मार्गाने बेहिशोबी संपत्ती मिळवतात. इथे आपल्या शिक्षणसंस्थेने शिक्षण दिले; परंतु मूल्य शिक्षण देण्यासाठी कमी पडले. नोकरदार घडवीला गेला; परंतु चांगला नागरिक नाही घडविता आला. आणि आता आपल्या देशाला नोकरदार घडविण्यापेक्षा चांगला नागरिक घडविणे गरजेचे आहे.
आज समाजात स्त्रीला समता व स्वातंत्र्य पुरुषांच्या बरोबरीने हक्क कायद्याने दिले आहेत परंतु खरोखरच स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले आहे का??? उलट अंत:करण हेलावून टाकणारी अक्राळ विक्राळ असे हिंसेचे रूप समाजात दिसून येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हाथरस प्रकरण. अगदी कोवळ्या वयाच्या बालिके वर सामूहिक बलात्कार करुन तिच्या प्रेताला पेटविले. निर्भया सारख्या अजुन किती भगिनी पुरुषांच्या छळाला बळी पडणार आहेत. किती जणांचे प्राण जाणार आणि किती जणांसाठी मेणबत्त्या पेटवल्या जाणार कुणास ठाऊक?? *पेराल ते उगवेल* या उक्ती प्रमाणे चांगले संस्कार प्रत्येक व्यक्तीला दिले पाहिजे. स्त्री ही उपभोगण्याची वस्तू नसून तिच्या ही काही इच्छा, अपेक्षा, महत्त्वकांक्षा आहेत आणि त्या जपल्या पाहिजेत. त्यासाठी विविध कार्यक्रम पथनाट्य घेऊन स्त्री-पुरुष समानता हे मूल्य रुजविणे गरजेचे आहे.
मुलांना श्रेष्ठ मानून करु नका स्त्रीचा अपमान
स्त्री-पुरुष एकसमान समजून करा स्त्रीचा सम्मान
समानता बाळगताना नसेल कोणी थोर महान
जिथे नांदेल स्त्री- पुरुष समानता असा माझा देश महान
अशा या माझ्या महान भारत देशात अनेक जाती धर्माचे, वंशाचे, वर्णाचे लोक राहतात. या सर्व लोकांची भाषा, संस्कृती, पोशाख, रीतिरिवाज वेगवेगळे आहेत. तरी देखील आम्ही सर्व भारतीय आपण एक आहोत, असे म्हणतो; परंतु आपण स्वतःच्या मनाला एक प्रामाणिक प्रश्न विचारावा, खरंच आपण एक आहोत का??? आणि जर हो हे उत्तर येत असेल तर आपल्या देशात अजून ही जातीय दंगली, जाती वरून वाद, जातीवरून भांडण का होतात? ज्या प्रमाणे पर्यावरण ही काळाची गरज आहे, लोकसंख्या नियंत्रण ही काळाची गरज आहे , भ्रष्टाचार निर्मूलन ही काळाची गरज आहे त्याचप्रमाणे जातीय सलोखा ही सुद्धा सर्वात जास्त महत्त्वाची काळाची गरज आहे.
भारतात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात परंतु काही विघ्नसंतोषी लोकांना ही शांतता बघवत नाही आणि मग गोध्रा हत्याकांड, धगधगता काश्मीर, मालेगाव प्रकरण कसे अंगावर शहारे आणते. माणूसच माणसाला खायला निघाला. अरे माणसा तुला मन, बुद्धी, वाचा सर्व काही सरस दिले आहे, त्याचा उपयोग असा करावा का? म्हणून च बहिणाबाई म्हणतात, *अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस*
आपण एकाच प्रभूची लेकरे आहोत.तुझे रक्त लाल माझे रक्त लाल. हिंदू चे रक्त लाल, मुस्लिम चे रक्त लाल, शीख- इसाई चे रक्त लाल मग हा भेदभाव कशासाठी? जातीय दंगली कशासाठी? हे कोठेतरी थांबायला पाहिजे, यासाठी प्रत्येक शाळेतून, प्रत्येक विद्यार्थ्याला , प्रत्येक व्यक्तीला नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले पाहिजे. मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा
शिक्षण हे एक शस्त्र आहे जे वापरुन तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता* आणि या शिक्षण शास्त्रानेच आपल्याला आपला भारत देश बदलायचा आहे. ज्या भारतामध्ये स्त्री-पुरुष समानता असेल सर्व धर्मांमध्ये एकी असेल, जिथे भ्रष्टाचार, खून , मारामारी, बलात्कार, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या घटना घडणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी संवेदनशीलता, वक्तशीरपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रभक्ती, सौजन्यशीलता, नीटनेटकेपणा,राष्ट्रीय एकात्मता ही मूल्ये रुजलेली असतील आणि आपल्या भारतातील प्रत्येक नागरिक हा फक्त नोकरदारच नाही तर एक सुजाण नागरिक बनलेला असेल.फक्त शिक्षणाला मूल्य शिक्षणाची जोड देऊन शिक्षण मिळावे
शिक्षणाने माणसाला सर्जनशीलता येते.सर्जनशीलतेने प्रगल्भ विचार येतात. विचारा ने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.
श्रीम. मुलाणी समिना रमजान
जि.प.प्राथ.शाळा,राजेभोसलेवस्ती
केंद्र राशीन ता. कर्जत
जि. अहमदनगर
This comment has been removed by the author.
ReplyDelete