पुस्तकाचे नाव : 'शिक्षणाचे जादुई बेट'
लेखक : डॉ. अभय बंग
शिक्षणपद्धतीवर लेखक डॉ. अभय बंग भाष्य करतात. त्यांचे मत, हे पुस्तक वाचून वाचकांचे मत बनल्याशिवाय राहत नाही.चला तर मग लागली ना उत्सुकता या पुस्तकात काय हवंय जाणून घेण्याची?
पूर्वी शिक्षण घेण्यासाठी गुरुंच्या आश्रमात जावे लागत होते. नंतर नंतर मात्र बालक मंदिरे ,जि.प. प्रा.शाळा ,माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालये आणि आणखी खाजगी शिक्षण संस्था आणि सध्या तर कोरोना काळातील मोबाईलवरही ऑनलाईन शिक्षण सध्या मिळत आहे.
'शिक्षणाचे जादुई बेट' या पुस्तकाचे लेखक डॉ.अभय बंग यांनी महात्मा गांधींच्या काळामध्ये शिक्षण घेतले. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या 'नई तालीम विद्यालयातील' शिक्षणपद्धती लेखकाला मनापासून आवडली .महात्मा गांधीजींचे नई तालीम हे नुसतेच विद्यालय नाही तर ते विद्यालय म्हणजे 'शिक्षणाचे जादुई बेट ' आहे असे ते बोलताना संबोधतात.
या पुस्तकाची पहिली आवृत्ती डिसेंबर 2013 मधील असून मुखपृष्ठ व आतील चित्रे तनया शिरसीकर यांनी काढले आहे . या पुस्तकाचे प्रकाशक श्री.अरविंद घन:श्याम पाटकर मनोविकास प्रकाशन पुणे हे आहे.
नई तालीम विद्यालयातील विद्यार्थीदशेच्या हुरहुर लावणाऱ्या आठवणींमधून त्या शिक्षण पद्धतीचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. लेखक म्हणतात, 'मी लहानपणी ज्या शाळेत शिकलो तशी शाळा, तशी शैक्षणिक संधी माझ्या मुलाला आनंदला मी आता देऊ शकत नाही. ही एक मोठी खंत आहे. आमच्या लहानपणीची गोष्टच और होती. आता तसं काही राहिलं नाही!'अशी कुरकुर हे म्हाताऱ्या मनाचं लक्षण आहे. हे माहीत असूनही मी खंत व्यक्त करतो. असं खरंच माझ्या शाळेत काय होतं? हे सांगताना ते म्हणतात माझं नववी पर्यंतचे शिक्षण गांधीजींच्या नई तालीम शिक्षण पद्धती झालं. शिक्षण म्हणजे निसर्गापासून तोडून चार भिंतीच्या आत बसून देण्याचा रटाळ धडा नाही तर निसर्गासोबत राहून समाजोपयोगी भूमिका
करताना प्राप्त होणारा संस्कार, बुद्धीचा विकास व कौशल्य हे आहे. गांधीजींच्या मागणीवरून रविंद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनमधून श्री. निकम व श्रीमती आशादेवी या सहिली- बंगाली जोडप्याला पाठवलं. त्यामुळे गांधीजींच्या शिक्षण पद्धतीला रविंद्रनाथांच्या निसर्ग व कलाप्रेमीची जोड मिळाली.
गांधीजींचे शिक्षण विचार, रविंद्रनाथांचे कलाप्रेम प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शाळेत वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या सृजनशील पद्धतींची अनेक उदाहरणे सांगितले आहेत. परीक्षेत पेपर सोडवणे व्यतिरिक्त प्रत्यक्ष शेती, स्वयंपाक करण्यापासून नाटक बसवून सादर करणे ,भाषण देणे लेख लिहिणे या विविध रंगांची परीक्षा व्हायची.
सर्वात वेगळा उपक्रम प्रयोग म्हणजे वर्ग ही संकल्पना अत्यंत लवचिक करण्यात आली होती .प्रत्येक विद्यार्थी काही विषयांत अधिक चांगला व काही विषयांत कमी चांगला असतो. त्याला सर्व विषयांसाठी एकाच वर्गात बसण्याऐवजी प्रत्येक विषयातील त्याच्या पातळीनुसार त्या त्या विषयासाठी वेगळ्या वर्गात बसवण्यात आले. म्हणून लेखक एकाच वर्षी इंग्रजीत सातवीत,गणितात नववी व मराठीत दहावीमध्ये होते.
मूल्यशिक्षण शिक्षणाचा अविभाज्य भाग होता. श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, समता सामूहिकता या गोष्टी शाळेत दररोज आचरणात आणून जीवनात जिरवत होते. मूल्यांसाठी चालणाऱ्या समाज परिवर्तनाच्या चळवळीत काही विद्यार्थ्यांचा व्यापक सहभाग होता. दरवर्षी काही काळ पूर्ण शाळा बंद होऊन भूदान
चळवळीत भाग घ्यायला जायची.
प्रत्येक विद्यार्थ्याला शेतीचा एक छोटासा तुकडा देण्यात आला होता. तिथे काय पेरायचे ?मशागत कधी करायची ?खत केंव्हा व कोणते याची सर्व जबाबदारी त्या मुलांची होती. विहिरीचे पाणी शेतीला देण्याची मागणी फार असायची. त्यामुळे मध्यरात्री कोल्ह्यांना निरखत शेतीला पाणी द्यायला विद्यार्थी जायचे. शेती करण्यासाठी ऍग्रोनामी व व्हार्टीकल्चर शिकवी लागे. रसायन शास्त्र समजून घ्यावे लागे. विद्यार्थ्यांची जास्त उत्पादनासाठी स्पर्धा लागलेली असायची.
कामातून विज्ञान शिक्षणाचं दुसरं उदाहरण म्हणजे स्वयंपाकाची जबाबदारी. शंभर जणांच्या स्वयंपाकासाठी आठ जणांचा गट. या गटाला प्रतिमाणसी किती रुपयांचे बजेट उपलब्ध आहे हे सांगण्यात येई. तसेच संतुलित आहार सर्वांच्या आवडीचा शिवाय बजेटमध्ये बसणारा असावा हा नियम होता. त्यामुळे गटाची धांदल उडत असायची. बटाट्याची भाजी स्वस्त पडेल पण त्यात आहाराचे तत्व कोणते हे पुस्तकात पाहिल्यावर फक्त स्टार्च आहे हे कळल्याने ती बाद होई. किमान आवश्यक तेल पदार्थ किती आहे हे पाहून आयसीएमआर च्या पोषक विषयक तक्त्यांवरून वरून पाहून तेवढे तेल टाकले तर बजेटच्या बाहेर जाई. कुशल गृहिणीला अनुभवाने उपलब्ध असलेले शहाणपण नसल्यामुळे त्यांची जेवणाची योजना बरेचदा पुस्तकी होई.शिवाय शिजवायला लागणारा वेळ व सरपणाचा हिशोब हमखास चुके. मग रात्रीच्या स्वयंपाकाची भांडी घासत आज हरलेल्या लढाईचे जखमी सैनिक उद्याच्या स्वयंपाकाची पुन्हा आखणी करीत. यातून आहारशास्त्र घरगुती अर्थशास्त्र व स्वयंपाक तीन शास्त्रे लेखक शिकले. कोथिंबिरीमध्ये १०,६०० युनिट्स व जीवनसत्त्व आहे हे आजही लेखकाच्या लक्षात आहे ते पुणे मेडिकल कॉलेजमध्ये दहा वर्षे शिकल्यामुळे नाही तर आठवीत स्वयंपाक घरात या पद्धतीने काम केल्यामुळे आहे.
शिवाय कुकर मधील उष्णतेचे व वाफेचे पदार्थ विज्ञानही शाळेच्या स्वयंपाक घरात शिकले.
दररोज सकाळी तीन तास उत्पादक काम हा शिक्षणाचा अविभाज्य भाग होता. नवीन गोशाळा बांधण्याचे काम सुरू होते एक गाय दररोज सरासरी किती वाजल्या पाणी पिते हे मोजून गोशाळेतील गाईंच्या पिण्याच्या पाण्याची एकूण गरज व तेवढे पाणी मिळू शकेल अशा टाक्यांचे माप ठरवून टाक्यांच्या भिंतीला किती विटा लागतील ही जबाबदारी लेखकाला दिली होती. बादली दंडगोल ,हौद हा घन. भिंती घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ या गणिती पद्धती शिकता आल्या .
आषाढी एकादशीच्या वेळी संत मेळावा साजरा व्हायचा. वेगवेगळ्या संतांची भजने संगीतासह बसवणे, यांच्या जीवनावर नाटके बसवून सादर करणे, चित्र काढणे ,एकच अभंग वेगवेगळ्या चालीवर गायला जायचा. संतकाव्य ,इतिहास, तत्वज्ञान हे खोलवर डुंबून शिकले.
भाषेचे धडे ,कविता दाट झाडांच्या फांद्यांवर बसून शिकवले जायचे ओढ्यांचा नद्यांचा सहवास मिळायचा. त्यातूनच निसर्गातील प्राणी ,पक्षी ,पाने, फुले ,फळे, वनस्पतीशास्त्राची ओळख झाली. परदेशातून आश्रमात येणारे पाहुणे, त्यांची भाषणे यांतून त्यांच्या देशाची माहिती मिळायची. वाचनातून प्रवासवर्णने भूगोल वर्तमानपत्रातून त्या घटनेमागचा इतिहास, सामान्यज्ञान, कळायचे.
शरीरश्रम करण्यात विद्यार्थ्यांचा शालेय वेळ खर्ची पडल्याने नई तालीमचा विद्यार्थी ज्ञानात मागे पडतो. असा एक आरोप अनेक वेळा केला जाई. लेखक म्हणतात, 'सर्व आवश्यक व अनावश्यक माहितीची भेंडोळी विद्यार्थ्यांच्या डोक्यात ठासून भरून ठेवणे व परीक्षेच्या वेळी त्याने ती जादुगारासारखी पटापट बाहेर काढणे हा ज्ञानाचा खरा अर्थ ज्यांच्या मनात आहे त्यांना कदाचित हा आरोप खरा वाटेल'. सल्फ्युरिक ऍसिडचा उत्पादनाच्या चार पद्धतींची विस्तृत माहिती नसेल तर विद्यार्थी रसायनशास्त्रात कसा कच्चा आहे असा निष्कर्ष ही मंडळी काढतील .नववीतील मुलाला या माहितीचा उपयोग.याच्याशी त्यांना कर्तव्य नसते. पण जीवनाशी संबंधित
शास्त्रात नई तालीमचा विद्यार्थी अधिक सखोल व कुशल असे.
लेखक म्हणतात, की माझ्या शाळेचे हे वर्णन आज सांगतो तेव्हा अनेकजण विचारतात, आता आहे का ती शाळा .आम्ही आमच्या मुलांना पाठवू .हीच या शाळेची शेवटची गोष्ट आहे. गांधीजींचे ग्रामोद्योग शासनाने अडगळीत टाकले व प्रस्थापित कारखान्यांच्या स्पर्धेत ते बाद झाले. या शाळेला शासकीय मान्यता नसल्याने ती देखील स्पर्धेत टिकू शकली नाही. कोणत्याही परिवर्तनाचे भेट आजूबाजूच्या विरोधी वातावरणात फार काळ टिकून राहू शकत नाही .याच कारणांनी समाजाच्या स्वार्थाच्या व स्पर्धांच्या लाटांनी एक दिवस हेच शिक्षणाचे अद्भुत बेट गिळून टाकले.
लेखक म्हणतात ,'माझ्या मुलांना मी त्या बेटावर पाठवू इच्छितो पण ते जादूभरे बेट आता कुठे आहे?'
शुभांगी राधाकृष्ण भालेकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राशीन मुली. केंद्र राशीन
ता.-कर्जत,जि.- अहमदनगर
जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीद्वारे 'मला आवडलेले पुस्तक 'या विषयावर आयोजित स्पर्धेमध्ये 'शिक्षणाचे जादुई बेट' या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. शब्द संख्या : ९८३
कर्जत तालुक्यातील शिक्षकाकरिता उत्तम असे प्लॅटफॉर्म या ब्लॉग च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले.सर्व सहकारी गटविकास अधिकारी,गटशिक्षण अधिकारी,तंत्र स्नेही पवार सर आपले खूप खूप धन्यवाद 👍👍🙏🙏
ReplyDelete